मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात सरकारी भ्रष्टाचाराचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलं होतं. येथे ४७ जणांचा कागदोपत्री २७९ वेळा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं दाखवून सरकारी अधिकाऱ्यांनी ११ कोटी २६ लाख रुपये गिळंकृत केले होते. या मृतांपैकी एक शेतकरी असलेले संत कुमार बघेल यांचा तब्बल १९ वेळा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले. तसेच त्यांच्या नावावर ७६ लाख रुपयांची नुकसान भरपाई ओरपण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी १९ वेळा मृत दाखवलेले संत कुमार हे प्रत्यक्षात जिवंत असून, ठणठणीत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना संत कुमार बघेल यांनी सांगितले की सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं दाखवत माझ्या नावावरून नुकसान भरपाईची रक्कम काढण्यात आल्याचं मला चार दिवसांपूर्वीच समजलं. मात्र मला आतापर्यंत कधीच सर्पदंश झालेला नाही. तसेच आमच्या गावात मागच्या ६०-७० वर्षांमध्ये केवळ एक-दोन जणांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे.
संत कुमार पुढे म्हणाले की, या घटनेमुळे माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. काही जणांना वाटतं की मी पैसे घेतले असतील, पण मी एक रुपयाही घेतलेला नाही. मी या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे.