शेतकरीला छत्री, आपलंला कपबशी, तर परिवर्तनला बस
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
नाकृउबा निवडणूक : चिन्ह वाटप
शेतकरीला छत्री, आपलंला कपबशी, तर परिवर्तनला बस
नाकृउबा निवडणूक : चिन्ह वाटपनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी (दि.१०) तीनही पॅनलला चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात शेतकरी विकास पॅनलला छत्री, आपलं पॅनलला कपबशी तसेच परिवर्तन पॅनलला बस ही निशाणी देण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अन्य उमेदवारांनाही दूरदर्शन, विमान, गॅस सिलिंडर, नारळ आणि गाजर या चिन्हांचे वाटप करण्यात आले.गुरुवारी (दि.९) अर्ज माघारीच्या दिवशी १६८ पैकी तब्बल ६४ उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात ६४ उमेदवारांचा समावेश होता. त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या आपलं पॅनल गटाचे हमाल व माथाडी गटातून एकमेव अर्ज असल्याने चंद्रकांत निकम यांची अविरोध निवडणूक झाल्यात जमा आहे, तर उर्वरित १७ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शुक्रवारी (दि.१०) या तीन अधिकृत पॅनलच्या ४६ उमेदवारांना तीन चिन्हांचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित १७ अपक्ष उमेदवारांना विविध निशाणींचे वाटप करण्यात आले. माजी खासदार देवीदास पिंगळे तसेच खासदार हेमंत गोडसे व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या आपलं पॅनलला मागणीनुसार कपबशी या चिन्हाचे वाटप निवडणूक निर्णय अधिकार्यांनी केले, तर माजीमंत्री बबनराव घोलप व महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्या शेतकरी विकास पॅनलने प्रथम पसंती छत्री या चिन्हाला दिली होती. त्यानुसार शेतकरी विकास पॅनलला छत्री चिन्हाचे वाटप करण्यात आले. भाजपा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला बस या चिन्हाचे वाटप करण्यात आले. आपलं व शेतकरी विकास पॅनलचे संपूर्ण १७ जागांसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, परिवर्तन पॅनलचे १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)इन्फो..प्रचाराचा नारळ फुटलाशुक्रवारी तीनही पॅनलला निवडणुकीचे चिन्ह प्राप्त होताच दोन्ही प्रमुख पॅनलच्या नेत्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ वाढविला. त्यात त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात दर्शन घेऊन आपलं पॅनलचे नेते देवीदास पिंगळे यांनी उमेदवारांसह प्रचाराचा नारळ वाढविला, तर शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंबळे यांनी प्रचाराचा नारळ नांदुरी येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढविला. येत्या २६ जुलैला बाजार समितीसाठी मतदान होत असून, २७ जुलैला लगेचच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी पंधरवड्याचा वेळ आहे.