Indian Railway:भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. हे प्रकरण जनरल किंवा स्लीपर कोचमधील नाही तर फर्स्ट एसी कोचमधील आहे जो ट्रेनचा सर्वात महागडा कोच मानला जातो. याच फर्स्ट एसी कोचमधील चोरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी एसी कोचमधील चादरी चोरल्याची प्रकार समोर आला. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही चोरी उघडकीस आणली.
पुरी आणि दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या पहिल्या एसी कोचमधून बेडशीट आणि टॉवेल चोरणाऱ्या एका कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवासी तिकीट परीक्षक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कुटुंबावर प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या बेडशीट आणि टॉवेल चोरल्याचा आरोप केला. प्लॅटफॉर्मवर एक महिला आणि दोन पुरुष या वस्तू परत करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या.
दिल्ली-ओडिशा पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोचमधून रेल्वेने पुरवलेल्या चादरी आणि टॉवेल चोरताना एका महिलेसह दोन प्रवाशांना पकडण्यात आले आहे. ही चोरी एका रेल्वे अटेंडंटने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. देवब्रत साहू नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आणि म्हटलं की, "पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीमध्ये प्रवास करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पण काही लोक असे आहेत जे चोरी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ते प्रवासादरम्यान आराम देण्यासाठी बनवलेले बेडिंग आणि टॉवेल चोरतात आणि घरी घेऊन जातात."
व्हिडिओमध्ये, रेल्वे कर्मचारी त्या प्रवाशांवर ओरडताना दिसत आहे. तो प्रवाशांनी घेतलेल्या वस्तूंकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, "सर पहा, सर्व बॅगांमधून चादरी आणि ब्लँकेट बाहेर पडत आहेत. एकूण चार सेट टॉवेल आणि चादरी. ते परत करा किंवा ७८० रुपये द्या." यावर प्रवाशाने उत्तर दिले की, चूक झाली असावी, माझ्या आईने नकळत त्या पॅक केल्या. पण रेल्वे कर्मचाऱ्याने हे स्पष्टीकरण स्विकारलं नाही आणि तुम्ही फर्स्ट एसीमधेय चोरी करताय आणि तीर्थयात्रेला जाताय असं म्हटलं.
त्यानंतर टीटीईने हस्तक्षेप केला आणि प्रवाशांला रेल्वे कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला आणि दंड भरण्यास सांगितले. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या.