अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांच्याविषयी उत्तर प्रदेशातील एका युवकाने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टने इन्टेलिजन्स ब्युरो (आयबी) सतर्क झाला आहे. यामुळे मोदी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.पोलीस सूत्रांनुसार इन्झमाम कादरी नावाच्या उत्तर प्रदेशातील व्यक्तीने हे फेसबुक पोस्ट टाकले होते. त्यात असे लिहिले होते,‘मोदी की माँ को किडनॅप करले तो जो भी चाहे वो करवा सकते है.( मोदींच्या आईचे अपहरण केले तर जे हवे ते करून घेता येऊ शकेल.) या पोस्टवर अनेक संतप्त मते नोंदविली गेल्यानंतर आता हे पोस्ट फेसबुकवरून काढून टाकण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.मोदींच्या मातोश्री हिराबा गांधीनगरमध्ये राहतात. पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांना ‘एसपीजी’ची अभेद्य सुरक्षा आहे व नियमानुसार त्यांच्या कुटुंबासही (आई, पत्नी वगैरे) त्याच दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली जाऊ शकते. परंतु हिराबा यांनी ‘एसपीजी’ची सुरक्षा नाकारल्यानंतर गुजरात पोलीस, वरकरणी दिसणार नाही ्अशा पद्धतीने, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था पाहात आहेत.या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी याआधीच तपास सुरु केला असून गुजरात पोलिसांनी शहानिशा करून आपल्या पातळीवर आवश्यक ती सावधानता बाळगावी यासाठी या पोस्टची माहिती आम्हाला देण्यात आली होती, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. गुजरात पोलिसांची गुप्तचर यंत्रणा व राज्याच्या गृह विभागाने यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. राज्य सरकारने हिराबा यांना आधीपासूनच सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे, असे गृह विभागाकडून नमूद करण्यात आले. (वृत्तसंस्था)
मोदींच्या आईविषयी फेसबुक पोस्टने ‘आयबी’ सतर्क
By admin | Updated: June 23, 2014 04:33 IST