दिल्लीउच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ कारवाई करत दिल्ली पोलिसांनी न्यायालयाचा परिसर तात्काळ रिकामा केला आहे. हा धमकीचा मेल शुक्रवारी सकाळी आला असून, यात स्पष्ट शब्दांत अशी धमकी देण्यात आली आहे की, "पवित्र शुक्रवार, स्फोटांसाठी पाकिस्तान-तामिळनाडूची मिलिभगत" यासोबत हे स्फोट २ वाजल्यानंतर होणार असल्याचे देखील म्हटले आहे.
या ईमेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एक व्यक्तीने पाकिस्तानच्या आयसीसला संपर्क करून पाटणातील १९९८सारखे स्फोट पुन्हा घडवून आणण्याची योजना आखली आहे. या मेलमध्ये राजकीय नेते आणि आरएसएसबद्दल देखील आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. यासोबतच एक मोबाईल नंबर आणि कथित आयईडी डिव्हाईस संदर्भात देखील माहिती दिली गेली आहे.
या ईमेलमध्ये राजकीय पक्षांवर घराणेशाहीचे राजकारण आणि भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, "मूलभूत फंडा असा आहे की, धर्मनिरपेक्ष पक्ष भाजप-आरएसएसशी लढण्यासाठी नाईलाजाने घराणेशाहीचे राजकारण आणि भ्रष्टाचार वाढू देत आहेत. जेव्हा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवले जाते, तेव्हा त्यांना आरएसएसविरुद्ध लढण्यात रस कमी होतो.' या ईमेलमध्ये सत्यभामा सेनगोट्टायन नावाच्या व्यक्तीचा फोन नंबर आणि नाव देखील देण्यात आले आहे.
या धमकीच्या ईमेलनंतर न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला असून, सर्व प्रकरणांमध्ये नवीन तारखा देण्यात आल्या. आज सकाळी १०:४१ वाजता उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल अरुण भारद्वाज यांना हा धमकीचा ईमेल मिळाला. त्यानंतर काही वेळातच बॉम्ब निकामी पथकही उच्च न्यायालयाच्या आवारात पोहोचले.
संशयास्पद मेल मिळाल्यानंतर न्यायालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. सध्या सायबर सेलची टीम धमकीचा मेल कुठून पाठवला गेला आणि त्यामागे कोण कोण सहभागी आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.