आंध्र प्रदेशातील दगडखाणीत आज रविवारी मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी या खाणीत मोठा स्फोट झाला. यामध्ये ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर १० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांपैकी ४ जण गंजमचे आणि २ जण ओडिशातील गजपती जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज आंध्र प्रदेशातील वाप्तला जिल्ह्यातील बालिकुरुमा भागात एका दगडखाणीत कामगार काम करत होते.
यापैकी १८ कामगार ओडिशाचे होते. ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. इतर गंभीर जखमींना तात्काळ बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये गंजम जिल्ह्यातील दिगापहांडी भागातील ४ कामगार आणि गजपती जिल्ह्यातील मोहना पोलीस स्टेशन परिसरातील २ कामगारांचा समावेश आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.