नवी दिल्ली : इयत्ता ५ वी आणि ८वीची वार्षिक परीक्षा घेण्याची आणि त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच इयत्तेत ठेवण्याची मुभा शाळांना देणारी कायदा दुरुस्ती लोकसभेने बुधवारी मंजूर केली. संसदेने या आधी मंजूर केलेल्या शिक्षण हक्क कायद्यात इयत्ता आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यास अनुत्तीर्ण न करण्याची अथवा त्याला शाळेतून काढून न टाकण्याची सक्ती होती. त्यामुळे काही राज्यांमध्ये इयत्ता ५वी व ८वीची वार्षिक परीक्षाच घेतली जात नव्हती किंवा परीक्षा घेतली व त्यात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरी त्यास वरच्या इयत्तेत घेतले जात होते.इयत्ता आठवीपर्यंत कोणालाही अनुत्तीर्ण न करण्याची मूळ कायद्यातील ही सक्ती दूर करण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडले व ते लोकसभेने मंजूर केले. या दोन्ही इयत्तांमध्ये अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याने, खालावणारा शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी अशी दुरुस्ती करण्याची मागणी अनेक राज्यांनी केली होती, असे जावडेकर म्हणाले.
पाचवी आणि आठवीच्याही होणार परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:39 IST