कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातीस काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांनी वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. डी. के. शिवकुमार म्हणाले की, वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांचं निराकरण खुद्द दैवी हस्तक्षेप झाला तरी तातडीने होणार नाही. खुद्द देव जरी स्वर्गातून उतरून बंगळुरूच्या रस्त्यांवर आला तरी एक, दोन किंवा तीन वर्षांमध्ये काही बदलणार नाही. परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे.
या समस्येवरील उपाय सूचवताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, आपण योग्य पद्धतीने योजना बनवण्याची आणि ती प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता आहे. आम्ही येत्या काही दिवसांत उत्तम कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, विरोधी पक्षातील नेते आर. अशोक यांनी डी. के शिवकुमार यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, कर्नाटक सरकारकडे विकाासकामांसाठी पैसे नसल्याची बाब स्वीकार केल्यानंतर आता साक्षात देवही आले तरी पुढच्या दोन तीन वर्षांत बंगळुरूतील परिस्थिती बदलणार नाही, असं बंगळुरू विकास मंत्री डी. के. शिवकुमार सांगत आहेत. आर. अशोक पुढे म्हणाले की, जनतेला डी. के. शिवकुमार आणि त्यांच्या सरकारकडून काही अपेक्षा उरलेली नाही, कर्नाटक आणि बंगळुरूसाठी काँग्रेस सरकार हे शाप बनलं आहे. तसेच लोक हे सरकार बदलण्यासाठी वाट पाहत आहेत.