आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:49 PM2022-12-03T13:49:36+5:302022-12-03T13:50:14+5:30

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात सतत होताहेत लक्ष्य

Even after three decades of agitation, medha patkar is a villain for BJP! | आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच!

आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच!

Next

बडोदा : गुजरातमधील सर्वात मोठ्या सरदार सरोवर या सिंचन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला तीन दशकांहून अधिक काळ लोटला, प्रकल्प पूर्ण झाला, लाखो लोकांना पाणीही मिळाले; पण त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आजही भाजपकडून खलनायिका म्हणूनच रंगविले जात असल्याचा प्रत्यय निवडणूक प्रचारात जागोजागी येतो.

गुजरातची दुश्मन’ असे मेधाताईंना ठिकठिकाणच्या सभेत भाजपचे नेते संबोधत असतात. गुजरातला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प असून, त्याला विरोध करणाऱ्या पाटकर या गुजरातच्या शत्रू असल्याचे चित्र आजही भाजपकडून उभे केले जाते. मेधाताईंनी आंदोलनातील हजारो आदिवासींच्या पुनर्वसनाचा लढा यशस्वी केला. अनेकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं; पण गुजरातमधील भाजप सरकार आणि नेत्यांनी त्यांना नेहमीच दुश्मन म्हणून हिणवले. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा मेधाताई त्या यात्रेत काही वेळ चालल्या होत्या. त्यावरून गुजरातमधील नेतेच नव्हे तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेधाताईंबरोबरच राहुल गांधी व काँग्रेसवर निशाणा साधताना दिसतात. सरदार सरोवर प्रकल्पाला एक-दोन नव्हे तर तब्बल तीस वर्षे विरोध करणाऱ्या महिलेसोबत काँग्रेसचे नेते फिरत आहेत. हेच काँग्रेसवाले तुम्हाला मते मागायला येतील तेव्हा त्यांना या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहू नका, असा हल्ला मोदी हे राहुल गांधी वा मेधाताईंचे नाव न घेता चढवत आहेत.  

पाटकर या आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील, अशी चर्चा तीन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये होती. काही सामाजिक कार्यकर्ते हे त्यांना मागच्या दरवाजाने गुजरातच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. पाटकर यांनी २०१४ मध्ये आपतर्फे मुंबईत लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, गुजरातच्या राजकारणात उतरणार असल्याचा स्पष्ट इन्कार पाटकर यांनी त्यावेळी केला होता.

मला गुजरातचे दुश्मन म्हणता, गुजरातचे खरे दुश्मन तर भाजप आाणि येथील सरकार आहे. मुळात ३० वर्षे मी प्रकल्प अडविला, हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सरकारने विरोध केला होता; आम्ही तर प्रकल्पग्रस्तांचे हक्क मागत राहिलो. सरदार सरोवरातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा शब्द भाजपच्या सरकारला आजही पाळता आलेला नाही. अदानींसारख्या उद्योगपतींना ते दिले गेले. ते अपयश झाकण्यासाठी मला लक्ष्य केले जाते.    
- मेधा पाटकर, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या.

Web Title: Even after three decades of agitation, medha patkar is a villain for BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.