बिहारच्या पटना येथील अधीक्षक अभियंता विनोद राय यांच्या निवासस्थानी ईओयूने छापा टाकला. या छाप्यादरम्यान ईओयूने विनोद राय यांच्या घरातून रोख रक्कम, दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि गुंतवणुकीशी संबंधित इतर कागदपत्रे जप्त केली. महत्त्वाचे म्हणजे, छाप्यापूर्वी विनोद रायने कारवाईच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात नोटा जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही पैसे संपले नाहीत.
अधीक्षक अभियंता विनोद राय मधुबनीहून पटना येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणत आहेत, अशी माहिती ईओयूला गुरुवारी कळली. विनोद राय हे मधुबनी विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील संभाळत आहेत. ईओयू पथक विनोद रायच्या पटना येथील निवासस्थानी पोहोचले आणि घराला घेराव घातला. रात्रीच्या वेळी झडती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवले आणि सांगितले की ती घरात एकटी आहे आणि रात्री झडती घेणे योग्य नाही. दरम्यान, अधिकाऱ्यांना घरातून जळण्याचा तीव्र वास येऊ लागला. संशय वाढल्याने पोलीस घरात घुसले. घरात प्रवेश करताच तेथील दृश्य पाहून पोलिसांसह ईओयू शॉक झाले.
घरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोटा जाळण्यात आल्या. बाथरूममधील पाईपमधून जळलेल्या नोटांचे तुकडे धुण्याचा प्रयत्न करण्यात आला. झडती दरम्यान,१२.५० लाख रुपयांच्या जळलेल्या नोटा थेट सापडल्या. तर, बाथरूमच्या पाईपमधून बाहेर पडणाऱ्या जळलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची किंमत दोन ते तीन कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. इतक्या नोटा जाळल्यानंतरही अधीक्षक अभियंता पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत.
घराच्या पाण्याच्या टाकीत लपवलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल पूर्णपणे सुरक्षित आढळले. पाण्याच्या टाकीतून एकूण ३९.५० लाख रुपये जप्त करण्यात आले. अशाप्रकारे, जळालेल्या आणि जप्त केलेल्या नोटा एकत्र करून आतापर्यंत एकूण ५२ लाख रुपये जप्त करण्यात आले.