रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर!! राज्यात इलेक्ट्रीक बसेस धावणार आहेत. जुलैअखेर त्यांचा प्रवास सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रिस्तरावर नियोजन होत असून, पहिल्या टप्प्यात चार मार्गांवर या बसमधून प्रवासाचा आनंद घेता येईल. विशेष म्हणजे, या बसचे भाडे तुलनेने कमी असेल व इंजिनाचा मोठा धडधड आवाजही नसेल.डोंगराळ भागात बसला मर्यांदा असल्याने पहिल्या टप्प्यात मुंबई- पुणे, पुणे -कोल्हापूर, औरंगाबाद- नांदेड व अकोला ते नागपूर या मार्गांचा विचार केला गेला आहे. चाचणी यशस्वी झाल्यास दुसऱ्या टप्प्यात ५० मार्गांवर या बसेस धावण्याचा मार्ग प्रशस्त होईल. सध्या नागपूर येथे इथेनॉलवर ‘ग्रीन बस’धावत आहे. ‘इलेक्ट्रीक बस’ हे त्याचे पुढचे पाऊल असेल.राज्याच्या बिघडलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी आता थेट केंद्रीय परिवहन मंत्रालय व केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने पुढाकार घेतल्याने आंतराष्ट्रीय बनावटीच्या चकचकीत ‘इलेक्ट्रीक बस’ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. मंगळवारी राजधानीत आलेल्या रावते यांनी गडकरी यांची परिवहन मंत्रालयात भेट घेतली. अवजड उद्योग मंत्रालयातर्फे बसमागे ३० लाख रूपयांची सवलत दिली जाणार असली तरी, राज्य सरकार व एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन केंद्राने शंभरटक्के सवलत देऊन ‘इलेक्ट्रीक बसेस’ महाराष्ट्राला द्याव्या, असा आग्रह परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केंद्राकडे धरल्याने गिते यांनी त्यांच्या मंत्रालयाला बसेससाठी अनुदानाची योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात धावणार ‘इलेक्ट्रीक बस’
By admin | Updated: March 12, 2015 01:54 IST