पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला अवकाश असला तरी मोर्चबांधणी सुरू झाली आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने स्वबळाचे संकेत दिले आहेत. अशातच ममता बॅनर्जींची अभिजीत मुखर्जींना साथ सोडली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र असलेल्या अभिजीत बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिजीत मुखर्जी यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिजीत मुखर्जी म्हणाले की, माझ्या मूळ घरी परत आलो आहे. असे करण्यापासून मला कोण थांबवू शकणार? दिल्लीवरून कोलकाताला यायला वेळ लागतो.
काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभिजीत मुखर्जी म्हणाले, "काहीही फरक पडत नाही की, काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती कशी आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे तृणमूल काँग्रेस सोडली आहे. त्या कारणांबद्दल आता भाष्य करू इच्छित नाही."
"काँग्रेसकडून जी काही जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडेन. आम्ही आदेशाचे पालन करणारे लोक आहोत", असेही अभिजीत मुखर्जी म्हणाले.
दोन वेळा राहिले खासदार
अभिजीत मुखर्जी दोन वेळा खासदार राहिले आहेत. प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती झाल्यानंतर रिक्त झालेल्या जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी २०१२ मध्ये निवडणूक लढवली. विजयी होऊन ते संसदेत पोहोचले. २०१४ मध्ये अभिजीत मुखर्जी हे जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले होते. मात्र, २०१९ मध्ये त्याचा पराभव झाला. तृणमूल काँग्रेसचे खलिलूर रहमान यांनी त्यांचा पराभव केला होता.
काँग्रेसमधून तृणमूल आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये
अभिजीत मुखर्जी यांनी २०२१ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते काँग्रेसकडे झुकल्याचे दिसत होते. ते काँग्रेसमध्ये जातील अशीही चर्चा होती.