निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ते राजीव कुमार यांची जागा घेतील. राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर १९ फेब्रुवारीला ज्ञानेश कुमार पदभार स्वीकारतील. जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कार्यकाळ) कायदा-२०२३ च्या कलम ४ च्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
कोण आहेत ज्ञानेश कुमार?
ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चपासून ते निवडणूक आयुक्तपदाची धुरा सांभाळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची सोमवारी (१७ फेब्रुवारी ) सायंकाळी दिल्लीत बैठक झाली. यानंतर, पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (सीईसी) नावाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली. पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील या समितीचा भाग होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेदरम्यान, राहुल गांधी यांनी असहमती पत्र पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावर सुनावणी असल्याने त्यांनी यापूर्वी बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न
अधिसूचना जारी करण्यापूर्वी, आज पंतप्रधान कार्यालयात निवड समितीची बैठक झाली. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात भाग घेतला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बैठक बोलावण्यात मोदी सरकारने दाखवलेल्या घाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. १९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निवड समितीवरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बैठक पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन, ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा अटी आणि कार्यकाळ) कायदा, २०२३ ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.