काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अलांड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन देणाऱ्या हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न झाला, असाही दावा राहुल गांधींनी केला. यावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी म्हणाले की,"अलांड मतदारसंघात ६ हजार ०१८ मतदारांच्या नावांची वगळण्याची अर्जाद्वारे विनंती करण्यात आली आणि संबंधित मतदारांना याची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६ हजार ८५० नवीन नावे जोडण्यात आली. कर्नाटक सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे काही विशिष्ट माहिती मागितली होती. मात्र, आयोगाने ती माहिती दिली नाही." तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने कर्नाटक सीआयडीला एका आठवड्यात संपूर्ण माहिती द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तरदरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. "राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. कोणताही सामान्य नागरिक ऑनलाइन पद्धतीने थेट मतदारांचे नाव हटवू शकत नाही, यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते. कुठल्याही व्यक्तीचे नाव हटवण्यापूर्वी त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले जाते. दरम्यान, २०२३ मध्ये अलांड मतदारसंघात अशा प्रकारचे काही अपयशी प्रयत्न झाले होते आणि या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्वतः एफआयआर नोंदवला होता", असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. पुढे आयोगाने सांगितले की, "२०१८ मध्ये आलांड मतदारसंघातून भाजपचे सुभद गुट्टेदार विजयी झाले होते. तर, २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील हे विजयी झाले."