-हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने भलेही कडक नियम लागू केले असतील, पण त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी या आयोगाला पुरेसे अधिकार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांवर कठोर कारवाई होण्याची कमी शक्यता आहे.
विशिष्ट उमेदवाराने निवडणुकांसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोग भविष्यातील मिरवणुका व प्रचाराचे कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश देऊ शकतो. त्यापायी कारवाई म्हणून आयोगाला त्या उमेदवाराच्या मतदारसंघातील मतदान रद्द करता येणार नाही. मात्र आदेशांचे पालन होत नसल्याचे निवडणूक निरीक्षकांना आढळल्यास केंद्रीय निवडणूक आयोग उमेदवार किंवा पक्षाविरुद्ध कारवाई करू शकतो. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांत ९०० निवडणूक निरीक्षक उमेदवार व पक्षांवर बारीक नजर ठेवणार आहेत.
नियम न पाळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणारकोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोग निवडणूक रद्द करू शकणार नाही. नियम न पाळणाऱ्या उमेदवाराविरोधात गुन्हा नोंदवून मग त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नियमभंग करणाऱ्यांवर काय कारवाई केली याचे ठोस उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाही.