एका सत्तर वर्षांच्या महिलेने सोवमारी तिरुमाला तिरुपती देवस्थानमच्या (टीटीडी) श्री व्यंकटेश्वरम सर्व श्रेयस (एस व्ही बालामंदिर) ट्रस्टला ५० लाख रुपयांची रक्कम दान दिली. या महिलेने मागच्या ३५ वर्षांमध्ये बचत करून ही रक्कम जमवली होती. रेनिगुंटा येथील सी मोहना या महिलेने संयुक्त राष्ट्रांसह कोसोवो, अल्बानिया, येमेन, सौदी अरेूिया आणि भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करताना केलेल्या बचतीमधून जमलेली रक्कम दान केली आहे.
याबाबत मंदिर समितीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून अधिक माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, एक सत्तर वर्षांच्या देणगीदार सी. मोहना या महिलेने मागच्या ३५ वर्षांत विविध पदांवरील आपल्या सेवेदरम्यान वाचवलेले पैसे टीटीडी शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्या अनाथ आणि गरीब मुलांच्या कल्याणासाठी दान केले आहेत. त्यांनी तिरुमाला येथ टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सी.एच. व्यंकय्या चौधरी यांना डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही रक्कम सोपवली आहे. टीटीडी तिरुपतीमध्ये भगवान व्यंकटेश्वर यांच्या मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे.
तिरुपती मंदिराचं संचालन तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टकडून केलं जातं. या मंदिराकडे एकूण किती संपत्ती आहे, याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र एका अंदाजानुसार मंदिराकडे ३७ हजार कोटी रुपये एवढी संपत्ती असल्याचं बोललं जातं.