नवी दिल्ली : ईडीने मागील १० वर्षांत राजकीय नेत्यांविरुद्ध १९३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी दोन प्रकरणांत शिक्षा झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली.
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मनी लाँड्रिंगविरोधी संस्थेने आजी-माजी आमदार-खासदार तसेच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत; परंतु त्याचा राज्यनिहाय तपशील उपलब्ध नाही. एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान या श्रेणीतील व्यक्तींविरुद्ध ईडीने १९३ गुन्हे दाखल केले. २०१६-१७ आर्थिक वर्षात एक आणि २०१९-२० मध्ये दुसऱ्या प्रकरणात दोषींना शिक्षा झालेली आहे. त्यात कोणी निर्दोष सुटले नाही, असे त्यांनी सांगितले.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात सर्वाधिक खटले२०२२-२३ या आर्थिक वर्षात आजी-माजी आमदारांविरुद्ध ईडीने सर्वाधिक ३२ खटले दाखल केले. ईडी विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे प्रकरणे हाती घेते. यात राजकीय संलग्नता पाहिली जात नाही, असे उत्तरात नमूद केले आहे.