निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मतदारांची नावे मतदार यादीतून अनधिकृतपणे काढण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रांचा गैरवापर थांबवण्यासाठी 'ई-साइन' नावाची नवी प्रणाली सुरू केली. यामुळे पडताळणीशिवाय कोणाचेही नाव यादीतून काढता येणार नाही.
ई-साइन प्रणाली काय आहे?
नवे फीचर्स: निवडणूक आयोगाने त्यांच्या ECINET पोर्टल आणि ॲपवर हे नवीन 'ई-साइन' फीचर सुरू केले.
उद्देश: या प्रणालीचा मुख्य उद्देश मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी येणाऱ्या अर्जांची अचूक ओळख पटवणे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळता येईल.
आधार-आधारित पडताळणी: या नवीन प्रणालीनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती नाव वगळण्यासाठी (फॉर्म ७), नवीन नोंदणीसाठी (फॉर्म ६) किंवा दुरुस्तीसाठी (फॉर्म ८) अर्ज करते, तेव्हा तिला आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपीद्वारे (OTP) ओळख पडताळणी करावी लागेल.
ही प्रणाली कशी काम करेल?
- अर्जदाराने ECINET पोर्टलवर फॉर्म भरल्यानंतर, त्याला ई-स्वाक्षरी करावी लागेल.- मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डवरील नाव एक आहे का? आधार मोबाईल नंबरशी जोडलेला आहे का? हे सुनिश्चित करते.- त्यानंतर अर्जदाराला आपला आधार क्रमांक टाकावा लागतो.- आधार क्रमांक टाकल्यानंतर, आधारशी जोडलेल्या फोन नंबरवर एक ओटीपी येतो.- ओटीपी टाकल्यानंतर आणि संमती दिल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण होते आणि अर्जदार फॉर्म सबमिट करण्यासाठी ECINET पोर्टलवर परत येतो.
याआधी कोणतीही पडताळणी न करताच अर्ज सबमिट करता येत होते, ज्यामुळे ओळखपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त होती. नवीन ई-साइन प्रणालीमुळे अशा प्रकारच्या फसव्या अर्जांना आळा घालण्यास मदत होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले.