नवी दिल्ली: वायू प्रदूषणामुळे भारतीयांच्या वयोमानात 2.6 वर्षांनी घट झाल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. जगाच्या तुलनेत आशियातील वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे. वायू प्रदूषण आणि त्यामुळे होणारे गंभीर आजार यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हरन्मेंट (सीएसई) संस्थेनं तयार केलेल्या अहवालात जगातील वाढत्या प्रदूषणाचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. घरातील आणि घराबाहेरील प्रदूषणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. 'भारतीय नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कारणांचा विचार केल्यास त्यात वायू प्रदूषण तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाढतं शहरीकरण, ओझोनचं नुकसान आणि घरगुती प्रदूषण यांमुळे मानवी जीवाला असलेला धोका वाढत आहे,' अशी माहिती अहवालात आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण चिंताजनक असल्याचं अहवाल सांगतो. या देशातील माणसांचं आयुष्य 2.6 वर्षांनी कमी झालं आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारीचा विचार केल्यास हे प्रमाण जास्त आहे. वायू प्रदूषणामुळे जगातील लोकांचं आयुष्य 1.8 वर्षांनी कमी झालं आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
प्रदूषण वाढतंय, आयुष्य घटतंय; वायू प्रदूषणामुळे 2.6 वर्षांनी कमी झालं भारतीयांचं वयोमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 16:28 IST