पोलीस कर्मचार्यांसाठी भोजनाचा ठेका वादात आक्षेप : निविदाप्रक्रिया न राबवता हालचाली
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या भोजनाचा ठेका वादात सापडण्याची चिन्हे असून, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सदर ठेका कायदेशीरपणे निविदाप्रक्रिया न राबविता देण्याच्या हालचाली सुरू असल्याची तक्रार महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी केली आहे.
पोलीस कर्मचार्यांसाठी भोजनाचा ठेका वादात आक्षेप : निविदाप्रक्रिया न राबवता हालचाली
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या भोजनाचा ठेका वादात सापडण्याची चिन्हे असून, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सदर ठेका कायदेशीरपणे निविदाप्रक्रिया न राबविता देण्याच्या हालचाली सुरू असल्याची तक्रार महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात कविता कर्डक यांनी म्हटले आहे, सिंहस्थानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे १२ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. त्यासाठी बाहेरून पोलीसबळ मागविण्यात आले आहे. हळूहळू पोलीसबळ शहरात दाखल होत आहे. शहर पोलीस आयुक्तालयाने सदर कर्मचार्यांच्या भोजनासाठी ठेका दिला असून, त्यातील काही काम बचतगटांच्या महिलांना मिळालेले आहे. प्रति ९२ रुपये दराने भोजनाचा ठेका घेण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाप्रमाणेच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानेही भोजनाचा ठेका देण्यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार काही बचतगटांनी निविदा कार्यालयाकडे सादर केली असता कार्यालयाकडून मौखिक स्वरूपात सदर ठेक्यासाठी ई-निविदाप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु आजपावेतो कार्यालयाकडून ई-निविदा प्रक्रियेसंबंधी कुठलीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. १० ऑगस्टला कार्यालयात चौकशी केली असता सदर ठेका निविदाप्रक्रिया न राबविता परस्पर देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. सुमारे ३५०० कर्मचार्यांच्या भोजनाचा ठेका एका केटरर्सला प्रती १०२ रुपये दराने देण्याच्याही हालचाली सुरू आहेत. सदर ठेका कायदेशीर मार्गानेच द्यावा आणि स्थानिक भूमिपुत्रांना त्यात प्राधान्य द्यावे, अशी मागणी कविता कर्डक यांनी केली आहे.