नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेच्या सकारात्मक मूल्यांकनाला प्रतिसाद दिला आणि या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील भागीदारीच्या शक्यतांचा शोध घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास बुधवारी व्यक्त केला.
दरम्यान, ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावावे, अशी मागणी युरोपीय महासंघाकडे केल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
मोदी म्हणा, भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र व भागीदार आहेत. दोन्ही देश शक्य तितक्या लवकर व्यापार चर्चा पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. ट्रम्प यांच्याशी बोलण्यासही मी उत्सुक आहे.
भारतावर ५० टक्के कर लादण्याच्या निर्णयानंतर ट्रम्पच्या कडक टिप्पण्यांमुळे निर्माण झालेल्या तणावानंतर, दोन्ही देशांमधील संबंधांत सुधारणा होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
भारत-चीनवर १००% शुल्क लावा
भारत आणि चीनवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावा, अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय महासंघाकडे (ईयू) केली आहे. रशियावर दबाव वाढवून युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हे शुल्क लावण्यात यावे, असे ट्रम्प यांनी ईयूच्या अधिकाऱ्यांना एका बैठकीत सांगितले.