ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - मांसनिर्यातीला कडाडून विरोध करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपाने म्हशीच्या मांसनिर्यातीत आघाडीवर असलेल्या कंपन्यांकडून अडीच कोटी रुपयांच्या देणग्या स्वीकारल्याचे समोर आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये अलाना सन्स या कंपनीने अडीच कोटी रुपयांची देणगी दिल्याचे म्हटले आहे.
अलाना सन्स ही या क्षेत्रामध्ये अग्रणी असून बफेलो मीटच्या बाबतीत जागतिक स्तरावरील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असल्याचे वर्णन ही कंपनी स्वत:च करते. शारजाह स्थित शिराझ ए आर अलाना हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.
रिप्रेझेन्टेशन ऑफ पीपल्स अॅक्ट, १९५१ च्या २९ सी या कलमानुसार २० हजार रुपयांपेक्षश्रा जास्त किमतीच्या देणग्या करमुक्तीसाठी जाहीर कराव्या लागतात. त्यानुसार भाजपाने देणगीदारांची यादी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे ज्या काळात या देणग्या भाजपाने स्वीकारल्या त्याच काळामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी पिंक रिव्होल्युशनच्या विरोधात धडाकेबाज भाषणं देत होते.
गेल्या आर्थिक वर्षात भाजपाला सगळ्यात जास्त देणग्या मिळाल्या असून पक्षाने ४३७.३५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले आहे.