Donald Trump Tariff News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून भारतावर कर लादण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत ५० टक्क्यांपर्यंत हे कर लावले आहेत. भारतानेही आता सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताने अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची योजना सध्यासाठी पुढे ढकलली आहे. या करारांतर्गत, पी-८आय पोसायडॉन विमाने, स्ट्रायकर कॉम्बॅट व्हेईकल्स, एन्ट्री मिसाईल टँक खरेदी करण्याचे नियोजन होते. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह वॉशिंग्टनला जाणार होते, पण आता त्यांचा हा दौराही रद्द करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा करार ३१,५०० कोटी रुपयांचा होता. नवी दिल्लीने अमेरिकेकडून नवीन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याचे नियोजन स्थगित केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर शुल्क लादल्यानंतर भारताने हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्र्यांचा दौरा रद्द
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या आठवड्यात अमेरिकेला भेट देणार होते. पण त्यांनी हा दौरा पुढे ढकलला आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ नंतर भारत अॅक्शन मोडमध्ये
डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारताने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त कर लादला. भरत रशियाकडून तेल घेतो याचा अर्थ भारत रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला निधी देत आहे. यामुळे भारतीय निर्यातीवरील एकूण कर ५०% वर पोहोचला - कोणत्याही अमेरिकन व्यापारी भागीदारासाठी हा सर्वोच्च दर आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे विधान काय आहे?
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे भारतावरील टॅरिफबाबत ( Tariff News ) पहिल्यांदाच विधान समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाच्या उलट विधान परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले, "भारताच्या संदर्भात, मी एवढेच म्हणू शकतो की व्यापार असमतोल आणि रशियन तेल खरेदीबाबत राष्ट्रपती त्यांच्या चिंतांबद्दल अगदी स्पष्ट आहेत. तुम्ही त्यांना या प्रकरणात थेट कारवाई करताना पाहिले आहे." भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे त्यांच्याशी आमचा पूर्ण आणि स्पष्ट संवाद आहे आणि हे सुरूच राहील.