दाऊदचा ठावठिकाणा माहित नाही - केंद्र सरकारची कोलांटीउडी

By admin | Published: May 5, 2015 05:06 PM2015-05-05T17:06:14+5:302015-05-05T17:06:14+5:30

दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा आपल्याला माहित नसल्याचे सांगत केंद्र सरकारने सपशेल घुमजाव केले आहे.

Do not know the whereabouts of Dawood - Coalantiudi of the central government | दाऊदचा ठावठिकाणा माहित नाही - केंद्र सरकारची कोलांटीउडी

दाऊदचा ठावठिकाणा माहित नाही - केंद्र सरकारची कोलांटीउडी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - कुख्यात डॉन व मुंबई बाँबस्फोटासारख्या महत्त्वाच्या खटल्यातील आरोपी दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा आपल्याला माहित नसल्याचे सांगत केंद्र सरकारने सपशेल घुमजाव केले आहे. याआधी सत्तेत नसताना व नंतर सत्तेत आल्यानंतरही भाजपाप्रणीत केंद्र सरकारने दाऊद पाकिस्तानात लपल्याचे सांगितले होते. विरोधात असताना तर १५ दिवसांमध्ये दाऊदच्या मुसक्या वळवून त्याला भारतात आणू असे वक्तव्यही भाजपाचे नेते उच्चारवाने केले होते.
मात्र आज मंगळवारी, दाऊदच्या ठावठिकाण्याबाबत भारत सरकारला अजिबात कल्पना नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे. 
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दाऊद पाकिस्तानातच असल्याचा दावा केला होता. तसेच भारत सरकारने त्यांच्या कराचीतील वास्तव्याचे सर्व पुरावे पाकिस्तानला दिले आहेत, असे सांगण्यात आले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाऊदला पाकिस्तान आश्रय देत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता सरकारने अचानक कोलांटीउडी मारली आहे. 
एका सीबीआय अधिका-याच्या पुस्तकातील उल्लेखामुळे दाऊदचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दाऊद शरण यायला तयार होता असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १९९३ च्या मुंबईतील बाँबस्फोटांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले असल्याची केंद्र सरकारची अधिकृत भूमिका आहे. तर आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्येही दाऊद आरोपी असून आरोपपत्रामध्ये दाऊदच्या पाकिस्तानातील तीन पत्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने आज दिलेल्या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Do not know the whereabouts of Dawood - Coalantiudi of the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.