बेलापुरात नाईकांचा जिल्हाध्यक्षांना झटका सेवा संस्था: ससाणे समर्थकांची राष्ट्रवादीला साथ
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
श्रीरामपूर : काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व बेलापूर ग्रामपंचायतीचे सदस्य अरूण नाईक यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी बेलापूर सेवा संस्थेचा ठराव करताना राष्ट्रवादीची साथ धरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना जोर का झटका दिला.
बेलापुरात नाईकांचा जिल्हाध्यक्षांना झटका सेवा संस्था: ससाणे समर्थकांची राष्ट्रवादीला साथ
श्रीरामपूर : काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व बेलापूर ग्रामपंचायतीचे सदस्य अरूण नाईक यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी बेलापूर सेवा संस्थेचा ठराव करताना राष्ट्रवादीची साथ धरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना जोर का झटका दिला.बेलापूर सेवा सहकारी संस्थेत १७ संचालक आहेत. त्यात नाईक यांचाही समावेश आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी बेलापूर सेवा सहकारी संस्थेचा ठराव करताना नाईक यांनी आपल्या चार सदस्यांसह काँग्रेसविरोधात बंडाचा झेंडा फडकावित राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे रमेश अंबादास नवले यांच्या नावाचा सेवा संस्थेचा ठराव झाला. या संस्थेत नाईक, सुधीर नवले, शेषराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. शनिवारी सत्ताधारी ससाणे गटातील नाईक, पुष्पा कापसे, कारभारी कुताळ व रमेश नवले या चार सदस्यांनी राष्ट्रवादीचे भास्कर बंगाळ, देवीदास खंडागळे, सुरेश कुर्हे, सुनील भांड यांच्याशी हातमिळवणी करीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष ससाणेंना जिल्हा बँक व अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का दिला. जिल्हा बँक निवडणुकीसाठी संचालकाच्या नावाचा ठराव करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीस १४ पैकी नाईकांसोबतचे आठ सदस्यच हजर होते. सत्ताधारी सुधीर नवले व त्यांच्यासोबतचे ६ सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीचे रमेश नवले यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर झाला. ग्रामपंचायत व सेवा संस्थेत नाईक व जिल्हा परिषद सभापती शरद नवले यांना एकाकी पाडण्यात ससाणेंनी मोठी भूमिका बजावली होती. त्याचे उट्टे या दोघांनी ठरावाच्या माध्यमातून काढून ससाणेंना धक्का दिला. ही मोट बांधण्यासाठी या दोघांसह अभिषेक खंडागळे यांनीही पुढाकार घेतला होता. गावच्या विकासाठी, भल्यासाठी व पारदर्शी कारभार करण्यासाठी पक्ष, गटतट बाजूला ठेवून सर्वसमावेशक नेतृत्व देण्याच्या उद्देशाने सेवा संस्थेत हे पाऊल उचलल्याचे नाईक म्हणाले. तर कोरमच्या मुद्यावर हा ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा ससाणे समर्थक सुधीर नवले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)