ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्वपूर्ण आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत २००० सीसी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व डिझेल वाहनांची नोंदणी करण्यावर पुढच्यावर्षी ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे तसेच जे ट्रक दिल्लीसाठी नाहीत त्यांना राष्ट्रीय महामार्ग १ आणि ८ वरुन दिल्लीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दिल्लीसाठी सामान घेऊन येणा-या ट्रकवर पर्यावरण शुल्कापोटी जास्त रक्कम आकारण्याचे निर्देश दिले आहेत. राजधानीतील सर्व खासगी टॅक्सी चालकांना पुढच्यावर्षी एक मार्चपर्यंत त्यांच्या गाडया सीएनजी करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
छोटया डिझेल कारना आपल्या आदेशातून वगळून सर्वोच्च न्यायालयाने सर्वसामान्यांना मात्र दिलासा दिला आहे. दिल्ली सरकारने सम आणि विषम क्रमाकांच्या गाडयांसाठी आखलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या १५ दिवस आधी हे सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.