अनेकदा हायवेवरून जात असताना टोल वसूल केला जातो. तेव्हा काहीवेळा दोनवेळा टोल कापला जातो, काहीवेळा तुम्ही टोलवरून जात नाही तरी कुठेतरी भलतीकडेच तुमच्या फास्टॅगमधून पैसे कापल्याचा मेसेज येतो. या चुकीच्या कापल्या गेलेल्या पैशांची तक्रार करायची असते. ती केली तर तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता असते. २०२४ मध्ये अशा प्रकारच्या १२.५५ लाख प्रकरणांत रिफंड देण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे लिखीत उत्तर दिले. यामध्ये जर टोल एजन्सीने चुकीच्या पद्धतीने टोल कापला तर अतिरिक्त वापरकर्ता शुल्काच्या रकमेच्या १,५०० पट दंड आकारला जाणार आहे. २०२४ मध्ये चुकीच्या टोल कपातीमुळे एकूण १२.५५ लाख प्रकरणांत पैसे परत करण्यात आल्याचा एनएचएआयचा अहवाल आहे.
या वर्षात एकूण ४१० कोटी FASTag व्यवहार झाले, त्यात चुकीच्या कपातीच्या प्रकरणांची संख्या फक्त ०.०३ टक्के होती, असा दावा गडकरी यांनी केला आहे. चुकीच्या टोल कपातीच्या प्रकरणांसाठी आतापर्यंत टोल एजन्सींना २ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला आहे. पैसे परत करण्याच्या प्रकरणांत ४.४५ लाख प्रकरणे अशी होती की फास्टॅग रीड झाला नाही परंतू पैसे कापले गेल्याचे होती. तसेच डुप्लिकेट कपातीची १.३६ लाख प्रकरणे होती.१.२५ लाख प्रकरणांमध्ये परतीच्या प्रवासाचा लाभ देण्यात आला नाही. ४७,००० प्रकरणांमध्ये पेमेंट दुसऱ्या मार्गाने करण्यात आले.
गडकरींच्या दाव्यानुसार टोल प्लाझा ओलांडल्याशिवाय वाहनाकडून टोल वसूल केल्यास संबंधित टोल एजन्सीला १ लाख रुपयांचा दंड आकारला जातो. टोल प्लाझावर होणारे वाद, कर्मचाऱ्यांची अरेरावी आदी अनेक विषय असे आहेत की नियम पाळले जात नाहीत, असे गडकरींनीच एकदा लोकसभेतील उत्तरात कबुल केले होते. यामध्ये सुधारणा करण्याचेही आश्वासन यांनी तेव्हा दिले होते. आजही यापैकी बऱ्याच समस्या कायम आहेत.