अकोला : अकोल्यासह राज्यातील २५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. नवीन संचालक मंडळ नियुक्त करण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार असून, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांची लगबग लक्षात घेता बाजार समितीची निवडणूक आता ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तोपर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रभार पातूर येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक सुधाकर डोंगरे यांच्याकडे देण्यात आला आहे. अकोला जिल्ात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह मूर्तिजापूर, बाळापूर व बार्शिटाकळी या चार बाजार समितींवर शासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश शासनाने ३ मे रोजी जिल्हा सहकारी निबंधकांना पाठविले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एक वर्षापूर्वीच संपुष्टात आला. त्यानंतर मुदतवाढ मिळावी यासाठी मंडळाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर नागपूर उच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी शासनाच्या बाजूने निकाल देत मुदत वाढवून देता येत नसल्याचा आदेश दिला. त्यानंतर आता शासनाने पातूर येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक सुधाकर डोंगरे यांची अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. नवीन संचालक मंडळ नियुक्त होईपर्यंत बाजार समितीचा कार्यभार सुधाकर डोंगरे सांभाळणार आहेत. दरम्यान, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. १६ मेपर्यंत लोकसभा निवडणुकीची धामधूम चालणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू होणार आहे. बाजार समितीकडे लक्ष देण्यास आता शासनास वेळ नाही त्यामुळे बाजार समितीची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रभार उपनिबंधकांकडे
By admin | Updated: May 7, 2014 00:23 IST