नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या दंगलीतील कथित आरोपी व काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची मागणी फिर्यादी पक्षाने केली आहे. माजी खासदाराचा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचा दावा फिर्यादी पक्षाने विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या लेखी प्रतिज्ञापत्रात केला आहे. हत्येच्या प्रकरणात किमान जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
दिल्ली विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्याकडे फिर्यादी पक्षाने सज्जन कुमार यांना मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली. यावेळी तक्रारदाराचे वकील एच. एच. फुल्का यांनी फिर्यादी पक्षाच्या मागणीला पाठिंबा दिला. संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सज्जन कुमार यांच्या वकिलाने चर्चेसाठी आणखी वेळ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी (शुक्रवारी) रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले. वकिलांचे सुधारणा विधेयक-२०२५ ला विरोध करण्यासाठी वकील संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाच्या सुनावणीसाठी पुढील तारीख निश्चित करण्यात आली.
१ नोव्हेंबर १९८४ साली उसळलेल्या दंगलीतील जसवंत सिंग व त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पंजाबी बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, एका विशेष तपास पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी कुमारांच्या विरोधात आरोप निश्चित करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सज्जन कुमार सध्या तिहार कारागृहात कैद आहेत.