ताहीर हुसेनची अखेर आपकडून हकालपट्टी; घरातून पेट्रोल बॉम्ब फेकत होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 22:25 IST
आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य सापडले होते. त्याच्या घरातूनच दगड आणि पेट्रोल बॉम्बचा मारा होतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता.
ताहीर हुसेनची अखेर आपकडून हकालपट्टी; घरातून पेट्रोल बॉम्ब फेकत होते
नवी दिल्ली : दिल्लीतील गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे. यानंतर मोठमोठे धक्कादायक खुलासे होत आहेत. राज्यातील सत्ताधारी आपचा नगरसेवकच पेट्रोल बॉम्ब, कट्टे, दगडांसह रंगेहाथ पकडला गेला आहे. त्याच्या घरामध्ये हे साहित्य सापडले असून सुरूवातीला तो निर्दोष असल्याचे ढोल पिटणाऱ्या आपने त्याची पक्षाच्या सदस्यपदावरून हकालपट्टी केली आहे.
आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य सापडले होते. त्याच्या घरातूनच दगड आणि पेट्रोल बॉम्बचा मारा होतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता. ताहीर हुसेन यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता.
उत्तर-पूर्व दिल्लीमधील खजुरी परिसरात दंगल भडकवण्यामध्ये आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच ताहीर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांवर यापूर्वी गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा ताहीर हुसेन यांच्यावर आरोप केले होते. याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून ताहीरचेही नाव एफआयआरमध्ये नोंदविण्यात आले आहे.
ताहीर हुसेन यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जेव्हा दंगल झाली तेव्हा मी घरात नव्हतो. पोलिसांना मला आधीच तिथून नेले होते. माझ्या घरातून कोणी बॉम्बफेक केली हे मला ठावूक नाही. समोरच्या घरांतूनही माझ्या घराच्या दिशेने दगड भिरकावले जात होते, असा दावा त्यांनी केला आहे.