दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरील पार्कमध्ये जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमातून चोरी झालेल्या ₹१ कोटींच्या कलशाचं रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव ब्रजभूषण असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला उत्तर प्रदेशातील हापूर येथून पकडण्यात आलं आहे. ब्रजभूषण दिल्लीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. चोरीच्या वेळी त्याने धोती-कुर्ता घालून पुजारीचा वेश धारण केला होता.
एक नव्हे, तीन कलशांची चोरी!पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपीने सांगितलं की, एका नव्हे, तर तीन कलशांची चोरी झाली होती. पोलिसांनी आतापर्यंत एक कलश जप्त केला आहे. इतर दोन आरोपी आणि उरलेले दोन कलश शोधण्यासाठी गुन्हे शाखा तपास करत आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रार्थना समारंभात ही चोरी घडली, ज्यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
गर्दीचा फायदा घेऊन केली चोरीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ब्रजभूषण गर्दीत मिसळून आतमध्ये गेला आणि गर्दीचा फायदा घेत कलश घेऊन पसार झाला. चोरी झालेला कलश ७६० ग्रॅम सोनं आणि १५० ग्रॅम हिरे, माणिक आणि पन्ना यांनी जडवलेला होता. आयोजकांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं होतं की, या कलशाला खूप धार्मिक महत्त्व आहे आणि व्यावसायिक सुधीर जैन दररोज पूजेसाठी तो इथे आणत असत. या घटनेमुळे जैन समाजात तीव्र नाराजी पसरली होती.
पोलीस तपास सुरूपोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी अनेक दिवसांपासून या कार्यक्रमावर नजर ठेवून होता आणि त्याने पूर्वनियोजित पद्धतीने ही चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयितांच्या हालचाली कैद झाल्या होत्या, ज्यावरून तपास पुढे नेण्यात आला आणि अखेर ब्रजभूषणला पकडण्यात आलं. आता पोलीस इतर दोन आरोपी आणि उरलेल्या कलशांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत.