दिल्लीत अचानक आलेल्या वादळामुळे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नजफगडमध्ये राहणारं अजयचं कुटुंब या नैसर्गिक आपत्तीत पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. अजयची पत्नी ज्योती तिच्या तीन मुलांसह कानपूरमधील तिच्या गावावरुन अवघ्या वीस दिवसांपूर्वी दिल्लीला आली होती. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ज्योती गर्भवती होती म्हणून ती तिच्या पतीच्या गावी गेली होती. तिने सात महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता आणि अवघ्या वीस दिवसांपूर्वी ती नजफगडला तिच्या पतीकडे परतली होती.
शुक्रवारी सकाळी वादळ आलं तेव्हा ज्योती (२८) आणि तिची तीन मुलं - आर्यन (सात वर्षे), ऋषभ (पाच वर्षे) आणि प्रियांश (सात महिने) - खारखरी नाहर गावात त्यांच्या घरात झोपले होते. तेव्हा त्यांच्या घरावर कडुलिंबाचं मोठं झाड कोसळलं आणि त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अजयही जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं .
अजय शेतात मजूर म्हणून काम करतो. तो त्याच्या कुटुंबासह शेताच्या मध्यभागी बांधलेल्या एका खोलीत राहत होता. अजयचे काका सुखदेव कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, अजयच्या वडिलांनी सकाळी सहाच्या सुमारास त्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, एका व्यक्तीने अजयच्या घरावर झाड पडल्याची माहिती दिली. यानंतर, अजयचा चुलत भाऊ अंकुश कानपूरहून दिल्लीला निघाला.
अजय आणि ज्योती भाड्याच्या खोलीत राहत होते. ज्योती गर्भवती असताना ती कानपूरला गेली. यानंतर, अजय शेतात बांधलेल्या या खोलीत शिफ्ट झाला. त्यांनी असंही सांगितलं की अजय सुमारे १५ वर्षांपूर्वी कामासाठी दिल्लीला आला होता. तो गेल्या दोन वर्षांपासून देवराज सिंगकडे शेतमजूर म्हणून काम करत होता. दिल्लीमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे.