रविवारी कानपूरच्या चकेरी विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एक उंदीर शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यामुळे विमानाच्या उड्डाणाला तब्बल साडेतीन तास उशीर झाला. दुपारी ३:३० वाजता १४० प्रवासी विमानात चढत असताना, काही प्रवाशांनी केबिनमध्ये उंदीर पाहिला आणि लगेच क्रूला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सर्व प्रवाशांना विमानाबाहेर काढून लाउंजमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर, सीआयएसएफ कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानात उंदीर शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
विमानातील केबिन, शौचालय, पायलट केबिन आणि सामानासह प्रत्येक कोनाकोपऱ्याची तपासणी करण्यात आली. अनेक प्रयत्नांनंतर अखेर उंदीर पकडण्यात यश आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "विमानात दुसरा उंदीर नाही याची खात्री करण्यासाठी ही सखोल तपासणी करणे आवश्यक होते. कारण, उंदीरने एखादी महत्त्वाची वायर कापली असती, तर उड्डाणादरम्यान मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. संपूर्ण तपासणी आणि सुरक्षा तपासणीनंतर अडीच तासांनी प्रवाशांना पुन्हा विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली. अखेर, हे विमान सायंकाळी ६:१२ वाजता दिल्लीसाठी रवाना झाले. या विलंबामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
कानपूर विमानतळाचे संचालक संजय कुमार यांनी सांगितले की, "प्रवासी विमानात चढत असताना उंदीर दिसला. त्यानंतर तो पकडण्यात आला आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बसवून विमान रवाना करण्यात आले."