नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये वादळाच्या तडाख्याने रविवारपासून ८० जणांचा मृत्यू झाला तर १३६ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक बळी गेले असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा दिल्लीत दुप्पट वेगाने वादळ धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेशमध्ये ५१, पश्चिम बंगालमध्ये १४, आंध्र प्रदेशमध्ये १२, दिल्लीमध्ये २ तर उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. १३६ जखमींपैकी उत्तर प्रदेशमध्ये १२३, दिल्लीत ११ व उत्तराखंडमध्ये २ जण जखमी झाले आहेत. वादळ व वीज कोसळणे याचा तडाखा उत्तर प्रदेशमधील २४, प. बंगालमधील ६, आंध्र प्रदेशमधील ३, दिल्लीतील २ व उत्तराखंडमधील एका जिल्ह्याला बसला.इशारा : देशाच्या उत्तर व पश्चिम भागातील राज्यांत येत्या दोन ते तीन दिवसांतही वादळी वारे वाहतील.>वादळाचा सिलसिला सुरूचबारा दिवसांपूर्वी आलेल्या धुळीच्या वादळाच्या तडाख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये १३४ जणांचा बळी गेला होता व ४००हून अधिक जखमी झाले होते. या वादळाचा सर्वात जास्त फटका यूपीला बसला होता. त्यानंतर, ९ मे रोजी यूपीच्या काही भागांना पुन्हा वादळाचा तडाखा बसून, त्यात १८ ठार व २७ जखमी झाले होते.धुळीचे वादळ व विजांच्या कडकडाटाने दिल्ली व उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये रविवारपासून थैमान घातल्याने मोठे नुकसानही झाले आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने झाडे पडली असून, रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.
दिल्लीत अंदाजापेक्षा दुप्पट वेगाने आले वादळ, पाच राज्यांत ८० जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:54 IST