विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, आता 'आप'च्या पराभवाची मीमांसा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना, आम्ही बैठकीत समीक्षा करू आणि जी काही कमतरता असेल त्यावर काम करू, असे आपच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी म्हटले आहे. दरम्यान, १० वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाला एवढ्या मोठ्या पराभवाला का सामोरे जावे लागले? हे एका सर्वेक्षण संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 'लोकनीती-सीएसडीएस' ने २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान एक सर्वेक्षण केले. यात २८ विधानसभा मतदारसंघांतील ३१३७ लोकांचा समावेश होता. यातून, या निवडणुकीत स्थानिक मुद्दे कशा प्रकारे सर्वात महत्त्वाचे ठरले? हे समोर आले आहे. याशिवाय, ते आप आमदारांवर आणि पक्षावरही नाराज होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अर्ध्याहून अधिक मतदारांनी तर निवडणूक प्रचारापूर्वीच कुणाला मतदान करायचे हे देखील निश्चित केले होते.
या मुद्द्यांवरून नाराज होते लोक - केजरीवाल यांनी २०२० मध्ये यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी, आपण असे करू शकलो नाही, तर आपल्याला सत्तेतून बाहेर करू शकता, असेही केजरीवाल यांनी म्हटले होते. याशिवाय, हरियाणाने पाण्यात विष मिसळल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला होता. मात्र याचा जनतेवर फारसा परिणाम झाला नाही. लोकनीतीच्या सर्वेक्षणात 10 पैकी 8 लोकांनी यमुना नदीचा मुद्दा उपस्थित केला. 10 पैकी ८ लोकांनी प्रदूषण आणि पिण्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा मुद्दा - भाजप आणि काँग्रेसने 'आप'वर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनीही आपले काम केले. सर्वेक्षणात, दोन तृतीयांश लोकांनी आप सरकार भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे, तर २८ टक्के लोकांनी ते अत्यंत भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, १० पैकी चार जण म्हणाले, मुख्यमंत्री निवासस्थानावर अनावश्यक खर्च झाला. याशिवाय, 'आप' आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्हही उभे राहिले होते. यामुळे केवळ पक्षच नाही, तर आपचे मोठे नेतेही पराभूत झाले.