Delhi Election : नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली पॅरिससारखी आहे, अशी उपरोधिक टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. दिल्लीतील रिठाला भागात घाणीचे साम्राज्य बनलेल्या नाल्याची गांधी यांनी पाहणी केली. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी हे भाष्य केले आहे.
रिठाला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सुशांत मिश्रा निवडणूक लढवत आहेत. गांधी यांनी सोमवारी सीलमपूर येथे प्रचारसभेत केजरीवाल यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल हे दोघेही जनतेला खोटी आश्वासने देतात, असे राहुल गांधी म्हणाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री अतिशी यांनी काल्काजी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची एकूण संपत्ती ७७ लाख रुपये आहे.
‘मतांसाठी सोनसाखळ्या’दिल्लीच्या निवडणुकांपूर्वी मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजप पैसे, सोनसाखळ्या वाटत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व आप पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला आहे. आप पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा दिल्लीत सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला. भाजपकडे कोणताही कार्यक्रम नाही. दिल्लीत भाजपचा पराभव होणार आहे.
मतदार याद्यांमध्ये फेरफार मतदार याद्यांमध्ये संशयास्पद फेरफार होत असल्याची तक्रार भाजपने आयोगाकडे केली आहे. मतदार याद्यांमध्ये पाच लाख नव्या मतदारांच्या नोेंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. दिल्लीच्या एका भागातील ४० मतदारांची नावे वगळावी म्हणून अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला आहे.