Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या(8 फेब्रुवारी) लागणार आहेत. याच्या एक दिवस आधी राजधानीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी (7 फेब्रुवारी) नायब राज्यपालांच्या सूचनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) चे पथक माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे.
भाजपकडून फोन आल्याच्या आणि 15 कोटी रुपयांच्या ऑफर केल्याच्या AAP नेत्यांच्या दाव्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्या आदेशानंतर एसीबीची टीम आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी पाठवण्यात आली. एसीबीची टीम घरी पोहोचताच आम आदमी पार्टीच्या कायदेशीर टीमचे काही वकीलही केजरीवालांच्या घरी पोहोचले.
अरविंद केजरीवाल भेटलेच नाहीअरविंद केजरीवाल एसीबीच्या पथकाला भेटलेच नाही, त्यामुळे दीड तासानंतर एसीबीचे पथक त्यांच्या घराबाहेर पडले. पण, पथकाने केजरीवालांच्या कायदेशीर टीमला नोटीस दिली आणि त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले. दरम्यान, आप खासदार संजय सिंह यांनी 15 कोटींच्या ऑफरबाबत एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसीबीच्या कार्यालयात आप खासदार संजय सिंह यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो.