नवी दिल्ली : दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन झाले आहे. भाजपने निवडणूक काळात महिलांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यावरून आता आम आदमी पक्ष (आप) आक्रमक झाला आहे. दिल्लीतील महिलांना पैसे कधी मिळायला सुरुवात होणार असा सवाल, आपकडून सतत विचारला जात आहे. तर ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा होतील, असे भाजप म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीच्या मागील आप सरकारने सरकारी तिजोरी रिकामी केली आहे, असा आरोप दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केला आहे. तसेच, महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीचा पुनरुच्चार रेखा गुप्ता यांनी केला आहे. दुसरीकडे, रेखा गुप्ता यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, भाजपला आर्थिकदृष्ट्या मजबूत सरकार देण्यात आले आहे. तसेच, कारणं देण्याऐवजी भाजपने आपली आश्वासने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आतिशी यांनी म्हटले आहे.
दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन आज (२४ फेब्रुवारी) सुरू होत आहे. तत्पूर्वी, रेखा गुप्ता यांनी सोमवारी दिल्लीतील नवगठित आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाआधी प्रदेश कार्यालयात भाजप आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका झाल्या. या अंतर्गत दिल्लीतील पात्र महिलांना २,५०० रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत.
योजना लागू करण्याच्या तयारीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रेखा गुप्ता म्हणाल्या की, मागील सरकारने आमच्यासाठी अशी स्थिती निर्माण केली आहे की, तिजोरीत खडखडाट करून ठेवला आहे. जेव्हा आम्ही वित्तीय स्थितीचा आढावा करण्यासाठी बैठक घेतली तेव्हा ही बाब समोर आली. असे असले तरी आम्ही योजना नक्की लागू करणार आहेत.