Delhi Blast: जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका साध्या वाटणाऱ्या प्रकरणाच्या तपासातून आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा मोठा पर्दाफाश केला आहे. या नेटवर्कमध्ये डॉक्टर, प्राध्यापक, मौलवी आणि उच्चशिक्षित व्यावसायिक लोकांचा समावेश होता, ज्यामुळे याला 'व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल' असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तान-आधारित दहशतवादी हँडलर्सच्या संपर्कात असलेले हे लोक देशभरात मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होते. गेल्या ३० दिवसांत, भारतीय यंत्रणांनी दहशतवादी मॉड्यूलवर सात मोठे हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमधील पोस्टरपासून मिळालेले पुरावे फरिदाबादमधील मेडिकल कॉलेजपर्यंत येऊन पोहोचले. यात जवळजवळ २,९०० किलोग्रॅम स्फोटके देखील जप्त करण्यात आली.
पोस्टरपासून सुरू झाली चौकशी
या प्रकरणाची सुरुवात १९ ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या नौगाम परिसरात झाली. रात्रीतून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे धमकीचे पोस्टर्स चिकटवण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी तत्काळ या घटनेची चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी नौगाम येथील तीन ओव्हर ग्राउंड वर्कर्स आरिफ निसार डार, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद डार यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून दहशतवादाच्या या 'व्हाइट कॉलर' मॉड्यूलचा पहिला पुरावा मिळाला. त्यानंतर शोपियां येथील मौलवी इरफान अहमदचे नाव पुढे आले. मौलवी इरफान हा नगरमध्ये पॅरामेडिकल स्टाफ म्हणून काम करत होता आणि नौगाम मशिदीचा इमामही होता. त्याने सुशिक्षित तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात मुख्य भूमिका बजावली होती.
डॉक्टरांपर्यंत पोहोचलेले धागेदोरे
मौलवी इरफानच्या चौकशीतून दहशतवादी कट आखणाऱ्या डॉक्टरांपर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्या. ५ नोव्हेंबर रोजी मौलवीच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून डॉ. आदिल राठरला अटक करण्यात आली. त्याने देशभरात बॉम्बस्फोटांचे नियोजन, स्फोटकांच्या स्टोरेजची ठिकाणे आणि त्यांचे सहकारी डॉ. मुजम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांची माहिती दिली. ८ नोव्हेंबर रोजी डॉ. आदिलच्या कबुलीवरून, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीने फरीदाबादमधील अल-फलाह युनिव्हर्सिटीमधून डॉ. मुजम्मिल गनई याला अटक केली. मुजम्मिल याच विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक होता आणि जैश-ए-मोहम्मदशी त्याचे संबंध होते. डॉ. आदिलच्या जुन्या लॉकरमधून एक एके-४७ रायफल जप्त करण्यात आली.
२,९०० किलो स्फोटकांचा साठ जप्त
९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सखोल चौकशीतून या कटाची भयावहता समोर आली. जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत डॉ. मुजम्मिलच्या फरीदाबादच्या धौजा गावातील भाड्याच्या खोलीतून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा जप्त केला. या ठिकाणी २,९०० किलोग्रामहून अधिक आयईडी तयार करण्याचे साहित्य आढळले.
याच दिवशी, यूपी एसटीएफने लखनऊमधून डॉ. शाहीन सईदला अटक केली. ती डॉ. मुजम्मिलची मैत्रीण होती आणि जैशच्या 'महिला विंग'शी जोडलेली होती. तिच्या कारमधूनही एक एके-४७ रायफल जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर नबी याचे नाव समोर आले. तो अटकेपूर्वीच फरार झाला होता. १० नोव्हेंबर याच दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट झाला, ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक लोक जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही कार फरारी असलेला डॉ. उमर नबी चालवत होता.
तपास यंत्रणांनानुसार स्फोट झालेला आयईडी ही पूर्णपणे तयार नव्हता आणि ती कुठेतरी पेरण्याची योजना होती. 'व्हाइट कॉलर मॉड्यूल'चा पर्दाफाश झाल्यामुळे उमर नबीने आयईडी हलवण्याची घाई केली असावी आणि त्याच गडबडीत संध्याकाळी ६:५२ वाजता नेताजी सुभाष चंद्र बोस मार्गावर स्फोट झाला. या स्फोटात डॉ. उमर नबी आणि त्याचे अन्य दोन साथीदार मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या आरोपींनी सुरक्षा यंत्रणांच्या इंटरसेप्शनपासून वाचण्यासाठी एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सिस्टीम आणि टेलिग्राम चॅनेल्सचा वापर केला होता. ते पाकिस्तान-व्याप्त काश्मीर मध्ये बसलेल्या हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. मौलवी इरफानने पाकिस्तानी हँडलर्सच्या निर्देशानुसार डॉक्टरांना कट्टरपंथी बनवले होते. या प्रकरणानंतर या मॉड्यूलशी संबंधित ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे, ज्यात अन्य दोन मौलवी आणि विद्यार्थी देखील सामील आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही 'दहशतवादविरोधी लढ्यातील मोठी सफलता' असल्याचे म्हटले असून, आता आर्थिक स्त्रोत आणि उर्वरित दुवे शोधण्याचे काम सुरू आहे.
Web Summary : A terror module involving doctors, professors, and clerics was busted following the discovery of threatening posters in Srinagar. Investigations revealed a network linked to Pakistani handlers, planning attacks nationwide. Explosives were seized, but a Delhi blast involving a module member remains under investigation.
Web Summary : श्रीनगर में धमकी भरे पोस्टर मिलने के बाद डॉक्टरों, प्रोफेसरों और मौलवियों से जुड़े एक आतंकी मॉड्यूल का भंडाफोड़ हुआ। जांच में पाकिस्तानी संचालकों से जुड़े एक नेटवर्क का पता चला, जो देशभर में हमलों की योजना बना रहे थे। विस्फोटक जब्त किए गए, लेकिन एक मॉड्यूल सदस्य से जुड़े दिल्ली विस्फोट की जांच जारी है।