आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. जर 'आप'ने सरकार स्थापन केलं तर ते दिल्लीतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देतील. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना ५०% सूट देखील दिली जाईल असं म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, "आम्हाला विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुलभ करायची आहे. जर 'आप' निवडणूक जिंकली तर आम्ही दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास मोफत करण्याच्या मॉडेलवर काम करत आहोत. महिला विद्यार्थ्यांना आधीच याचा लाभ मिळत आहे."
"मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याची विनंती केली आहे. दिल्ली मेट्रो ही केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. आम्हाला आशा आहे की, ते या सार्वजनिक कल्याणकारी योजनेला सहमती देतील. केंद्र आणि दिल्ली सरकार विद्यार्थ्यांच्या सवलतींसाठी ५०:५० योगदान देऊ शकतात."
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिल्ली मेट्रोच्या भाड्यात ५० टक्के सब्सिडी देण्याची मागणी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "दिल्लीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये, महाविद्यालयात जाण्यासाठी खूप समस्या येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोवर अवलंबून आहेत."
केजरीवाल यांनी पुढे लिहिलं की, विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मी दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवतो. दिल्ली मेट्रो हा दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील ५०:५० सहकार्याचा प्रकल्प आहे. म्हणून यावर होणारा खर्च दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने समान रीतीने करावा.
"आमच्याकडून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची योजना आखत आहोत. मला मनापासून आशा आहे की, तुम्ही या प्रस्तावाशी सहमत व्हाल" असं पत्राच्या शेवटच्या भागात अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.