Delhi Assembly Election 2025 Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७ टक्के मतदान झाले होते. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिहेरी लढत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले असून, ०८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे. यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोलनुसार, या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसू शकतो, तर भाजपाचे सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
दिल्लीतील मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६९९ उमेदवारांच्या भवितव्याचा कौल मतदान यंत्रातून देण्यात आला. आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही दिल्लीत सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी आपल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे २५ वर्षांहून अधिक काळ दिल्लीतील सत्तेतून बाहेर असलेल्या भाजपाने यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणार ‘इतक्या’ जागा
२०२५च्या दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने स्वतंत्ररित्या लढली. हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचे भाग आहेत. परंतु, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीसोबत लढण्यास अनुत्सुकता दर्शवली. तर इंडिया आघाडीतील अन्य काही पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देत अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. या सगळ्यात काँग्रेस पक्ष एकटा पडल्याचे चित्र होते. दिल्ली निवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला मिळणाऱ्या जागांबाबत एकवाक्यता असल्याचे पाहायला मिळत आहे. पी मार्क यांच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला ० ते १ जागा मिळू शकते. तर, चाणक्य एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला २ ते ३ जागा मिळू शकतात. पीपल्स एक्झिट पोलनुसार, काँग्रेसच्या ० ते १ जागा येऊ शकतात.
दरम्यान, मार्टिज, व्ही प्रीसाइड आणि माइंड ब्रिंक एक्झिट पोलनुसार, ० ते १ जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो. तर, पोल डायरीच्या पोलनुसार, ० ते २ जागा काँग्रेसला जिंकता येऊ शकतात. जेव्हीसी पोल्सनुसार, काँग्रेसला ० ते २ जागांवर समाधान मानावे लागू शकते. डीव्ही रिसर्च आणि पीपल्स पल्स, काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नाही.