दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना जाहीर झाल्यानंतर हे लोक खूप घाबरले आहेत. त्यांनी येत्या काही दिवसांत खोटी केस तयार करून सीएम आतिशीला यांना अटक करण्याचा प्लॅन केला आहे असं म्हटलं.
भाजपाचं नाव न घेता अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, "त्याआधी 'आप'च्या वरिष्ठ नेत्यांवर छापे टाकले जातील. मी बुधवारी दुपारी १२ वाजता या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे." आपने देखील ट्विट केलं आहे. "महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हे बघून भाजपावाले चांगलेच घाबरले आहेत. भाजपावाल्यांनी कितीही कारस्थान केली तरी दिल्लीची जनता अरविंद केजरीवाल आणि सीएम आतिशी यांच्या पाठीशी उभी आहे."
"बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे आम्ही शिष्य आहोत. आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार नाही" असं आपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्ली सरकारच्या योजनेला घाबरले आहेत. यावेळीही दिल्लीतील जनता विरोधी पक्षांना धडा शिकवेल.
अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना जाहीर केली आहे. २३ डिसेंबर रोजी महिला सन्मान राशी आणि संजीवनी योजना सुरू केली होती. घरोघरी जाऊन महिलांना नोंदणी अर्ज देऊन त्यांचं कार्ड बनवण्यात आलं. आता आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन दोन्ही योजनांसाठी नोंदणी करून घेत आहेत.
दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत, आप सरकार १८ वर्षे वयाच्या प्रत्येक महिलेला २१०० रुपये देणार आहे. याशिवाय ६० आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांनाही खासगी रुग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहेत.