दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना शह काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आज आम आदमी पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. आपने भाजपाच्या दिल्ली मंदिर विभागाला सुरुंग लावला आहे. तसेच आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत अनेक धर्मगुरूंनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी केजरीवाल यांनी धर्मगुरूंना भगवी शाल घालून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
दरम्यान, आजपासून सनातन सेवा समितीची सुरवात करणार असल्याची घोषणाही आम आदमी पक्षाने केली आहे. भाजपाच्या मंदिर विभागातील १०० हून अधिक सदस्यांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. संपूर्ण दिल्लीतील पुजारी आम्हाला पाठिंबा देत असून ते आम्हाला आशीर्वाद देत आहेत, असा दावाही आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाने पुजारी आणि ग्रंथींना दरमहा १८ हजार रुपये मासिक वेतन देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, विजय शर्मा, जितेंद्र शर्मा, आचार्ज बृजेश शर्मा, मनिष गुप्ता, दुष्यंत शर्मा, उदयकांत झा, वीरेंद्र सोहनदास, श्रवण दास यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. तर अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले की, सनातन धर्मासाठी खूप मोठं काम केलं जात आहे. पुजारी आणि संत २४ तास काम करतात. तसेच भक्त आणि देवाच्या मध्ये दुवा म्हणून काम करतात.