ऑनलाइन लोकमत
आगरतळा, दि. 21 - जिमनॅस्ट दीपा कर्माकरला भेट स्वरुपात मिळालेली महागडी कार 'बीएमडब्ल्यू'साठी त्रिपुरा सरकारने ती रहात असलेल्या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दुरवस्थेत असलेले येथील रस्ते चकाचक होणार आहेत.
'दीपा रहात असलेल्या अभोयनगरपासून ते आगरतळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे बीएमडब्ल्यू सर्व्हिस सेंटर किंवा गॅरेजपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध होईल', असे आगरतळा महानगरपालिकेचे महापौर प्रफुल्लजीत सिन्हा यांनी सांगितले. रस्त्यांच्या डागडुजीला प्राधान्य देत सरकारने यासाठी 78 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-याने दिली आहे.
आणखी बातम्या
त्रिपुरा सरकारने घेतलेल्या निर्णयावर दीपाने आनंद व्यक्त केला आहे. 'बीएमडब्ल्यूसाठी आम्ही कधीही, कोणत्याही रस्त्यांसंदर्भात बोलणी केली नव्हती. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, कार चालवणे कठीण होतेच, तसेच देखभालीचा खर्चही परवडण्यासारखा नसल्याने आम्ही कार परत करण्याचा निर्णय घेतला होता', असे दीपाने सांगितले.
दीपा रहात असलेल्या ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असल्याने तिने बीएमडब्ल्यू कार परत करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल दीपाला हैदराबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनकडून ही महागडी कार 'बीएमडब्ल्यू' भेट स्वरुपात मिळाली होती.