भोपाळ : आपला जन्म होताच बेटी तो बोझ होती है असे कुणा एका उपस्थिताने म्हटल्याचे स्मरण करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या आईने मात्र आपल्याला भक्कमरीत्या घडविल्याचे अभिमानाने सांगितले. अशा प्रकारच्या घटनांना रोखण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे यावर त्यांनी एका कार्यक्रमात भर दिला.
मुलींचे शिक्षण हे केवळ त्यांच्या करिअरकरिता नसते, तर ते एका कुटुंबाच्या कल्याणाकरिता उपयोगी येत असते असे त्या पुढे म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, देशातील बेरोजगारीची समस्या हाताळण्यासाठी सरकार शिक्षण व कलागुणांना प्राधान्य यांचा समन्वय करीत असल्याचे म्हटले. याकरिता शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यावर मंत्रलय विचार करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलांसाठी ई-लायब्ररीची योजनाही आखली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. (वृत्तसंस्था)