Vande Bharat Express News: सुरुवातीला काहीसा संथ प्रतिसाद असलेली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांची पहिली पसंती ठरली. वंदे भारत ट्रेनला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरात सुरू असलेल्या वंदे भारत ट्रेनपैकी अनेक ट्रेनचे आरक्षण अनेकदा फुल्ल होत असल्याचे दिसत आहे. यातच एका वंदे भारत ट्रेनची अक्षरश: नाचक्की झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका राज्यातील मार्गावर वंदे भारत सुरू करण्यात आली. परंतु, उद्घाटनाच्या दिवशी या ट्रेनमधून २०० प्रवाशांनीही प्रवास केला नसल्याचे समोर आले आहे. यातच ही वंदे भारत ट्रेन सुमारे तासभर उशिराने धावली. त्यामुळेही या ट्रेनबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
एकही तिकीट बुक झाले नव्हते
दानापूर-जोगबनी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन १७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. परंतु, २ दिवसांत २०० प्रवाशांनीही या ट्रेनने प्रवास केला नाही. ही ट्रेन गुरुवारी सायंकाळी ७.०७ वाजता १७ मिनिटे उशिराने येथे पोहोचली. परतीच्या प्रवासात ही ट्रेन गुरुवारी जोगबनी येथून धावली. ही ट्रेन पहिल्याच दिवशी ५२ मिनिटे उशिराने मुझफ्फरपूर जंक्शनवर पोहोचली. ती सकाळी ९ ऐवजी ९.५२ वाजता पोहोचली. या दोन्ही वंदे भारत ट्रेनमध्ये मुझफ्फरपूरहून एकही तिकीट बुक झाले नव्हते, अशी माहिती देण्यात आली आहे.
...तर वंदे भारत ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळू शकला असता
वंदे भारतचे संचालन चांगले आहे. प्रवास खूप जलद आहे, परंतु तिकीट दर जास्त असल्याने सामान्य लोकांसाठी ते परवडण्यासारखे नाही. ही ट्रेन ज्या भागातून निघते त्या भागात प्रामुख्याने मध्यमवर्गीय लोकसंख्या आहे. वंदे भारतच्या एक्झिक्युटिव्ह क्लास तिकिटाच्या किमतीत इंटरसिटीमध्ये चार लोक प्रवास करू शकतात. त्यासाठी निश्चितच थोडा जास्त वेळ लागेल. जर तिकीट दर कमी असते, तर ते या भागात वंदे भारत ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळू शकला असता, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.