मेहसाणा: छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते, त्यांनी धर्म-पंथ कधीच मानला नाही, असं आपण इतिहासात शिकलो आहोत. शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती पंथांच्या व्यक्तींचा भरणा होता, हे तर आपण अनेकदा वाचलं आणि ऐकलं आहे. माणसाला माणूस म्हणून वागवा, ही शिवरायांची शिकवण होती. मात्र महाराजांनी दिलेल्या या शिकवणीच्या अगदी विरुद्ध घटना गुजरातच्या मेहसाणामध्ये घडली आहे. मेहसाणातील बहुचराजी गावातील सवर्णांनी एका दलित तरुणाला मारहाण केली आहे. दुचाकीला शिवरायांचं स्टिकर लावल्यानं सवर्ण तरुणांनी दलित युवकाला बेदम मारलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मेहसाणातील बहुचराजीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दलितांवरील अत्याचारांच्या बातम्या समोर येत आहेत. या भागात क्षत्रित समाजाचं प्राबाल्य आहे. याच क्षत्रिय समाजाच्या तरुणांनी दलित तरुणाला बेदम मारहाण केली. दुचाकीवर शिवरायांचं स्टिकर लावल्यानं सवर्ण तरुणांनी ही मारहाण केली. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव जयदेव परमार असं आहे. 20 वर्षांचा जयदेव बहुचराजीमध्ये सुरू झालेल्या मारुतीच्या कारखान्यात काम करायचा. जयदेव कंपनीतून घरी जात असताना त्याला काही सवर्ण तरुणांनी त्याला चौकात बोलावलं. जयदेव परमार चौकात पोहोचल्यावर सवर्ण तरुणांनी त्याच्या दुचाकीवर लावलेल्या स्टिकरवरुन त्याला मारहाण सुरू केली. यावेळी मारहाण करणाऱ्या काही तरुणांनी दुचाकीवरील स्टिकर काढण्याचा प्रयत्न केला. दलित असूनही शिवाजी महाराजांचं स्टिकर बाईकला का लावतोस, अशी विचारणा करुन तरुणांनी जयदेवला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर जयदेवनं तरुणांना स्टिकर काढण्याचं आश्वासन दिलं. यानंतर क्षत्रिय समाजाच्या तरुणांनी त्याला जखमी अवस्थेत त्याच्या घरी सोडलं. जयदेवला घरी सोडताना तरुणांनी त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.
बाईकला शिवरायांचा स्टिकर लावल्यानं दलित तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 15:52 IST