बिहारमधील वैशाली जिल्ह्यांतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बुधवारी पातेपूर प्रखंडातील मरूई पंचायतमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला. मौसम कुमारी (वय २२) असं मृत नवविवाहितेचं नाव असून, ती जयकिशन मंडल यांची एकुलती एक मुलगी होती.
दुधासाठी गॅस पेटवला अन् होत्याचं नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, मौसम कुमारी घरातील चार वर्षांच्या चिमुकलीसाठी गॅसवर दूध गरम करत होती. त्याचवेळी गॅस पाईपमधून गॅस गळायला लागला आणि क्षणातच गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला भीषण आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं. या आगीत होरपळून मौसमचा दुर्दैवी अंत झाला. घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं. एवढंच नाही, तर आगीने परिसरातील सुमारे १५ ते २० घरांनाही आपल्या कवेत घेतलं.
एका स्फोटात अनेकांचं संसार उद्ध्वस्त
मृत मौसम कुमारीचे काका विशुनदेव मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पुतणी लहान मुलीसाठी दूध गरम करत असतानाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या धक्क्याने शेजारच्या घरात ठेवलेला दुसरा गॅस सिलेंडरही फुटला आणि त्यामुळे आग आणखीनच भडकली. एकामागून एक सिलेंडर स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली आणि १५ ते २० घरं पूर्णपणे जळून खाक झाली. घरातील सर्व वस्तू, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अनेकांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आहे.
वर्षाभरापूर्वीच झालं होतं लग्न
मौसम कुमारीचं लग्न अवघ्या एका वर्षापूर्वीच झालं होतं, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. मृत महिलेचा पती मिथुन कुमार याने सांगितलं की, त्यांची पत्नी दूध गरम करत असताना गॅस गळती झाली आणि स्फोट झाला, ज्यात तिचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, एका बाजूला मुसळधार पाऊस पडत असतानाही, दुसरीकडे घरांना लागलेल्या आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
गावात शोककळा, पोलीस तपास सुरू
या भीषण घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मौसमच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी हाजीपूर सदर रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गॅस सिलेंडरच्या सुरक्षित वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.