अहमदाबादः गुजरातच्या काही भागांत ‘वायू’ वादळाचा प्रभाव जाणवला आहे. गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिली आहे. वायू चक्रीवादळ हे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडकणार नाही. हे चक्रीवादळ वेरावल, पोरबंदर, द्वारकाजवळून जाणार असून, गुजरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस येणार आहे. आज दुपारी सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरून चक्रीवादळ 135 ते 160 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरील जिल्हे दीव, गीर सोमनाथ, जुनागड, पोरबंदर आणि द्वारका प्रभावित होणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या काही भागांत गुरुवारी ‘वायू’ वादळ धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्याजवळील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सौराष्ट्र व कच्छमधील बंदरे व विमानतळांवरे बंद करण्यात आली आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वायू चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे.
Cyclone Vayu Update : गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 10:13 IST