नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाच्य अंदाजानूसार, गुजरातच्या देवभूमी द्वारकामध्ये 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कच्छ, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागढ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले.
मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, चक्रीवादळ १५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह सौराष्ट्र किनारपट्टीवर धडकेल. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ देवभूमी द्वारकापासून २९० किमी अंतरावर आणि गुजरातमधील जाखाऊ बंदरापासून २८० किमी अंतरावर आहे. तसेच बिपरजॉय वादळाची एक महत्वाची अपडेट म्हणजे या चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे आणि तो जवळपास स्थिर असल्याचे दिसून येतंय.
चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे पुढे सरकत आहे. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान आदळण्याची शक्यता आहे. गुजरातच्या कच्छ आणि मांडवी भागात याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.